उत्तर प्रदेश : सत्संग करत असताना आपण कोणत्याही प्रकारचा मागचा पुढचा विचार न करता यामध्ये सहभागी होतो. आणि अशा प्रकारच्या घटना घडतात. हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हाथरसमध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. सत्संगामध्ये ही भीषण दुर्घटना घडली आहे. भोले बाबांचे प्रवचन ऐकण्यासाठी हाथरस एटा सीमेजवळील रतिभानपूर येथे मोठ्या संख्येने लोक जमले होते. या सत्संगासाठी हजारो लोक उपस्थित होते, हे लोक मथुरा, आग्रा, फिरोजाबाद, एटा येथील असल्याची माहिती समोर येत आहे.
सत्संगाता झालेल्या चेंगराचेंगरीत १०० हून अधिक जणांनी जीव गमावल्याचं सांगण्यात येत आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत आतापर्यंत १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या जास्त आहे आणि अद्यापही अनेक जण बेशुद्ध अवस्थेत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला आहे.
सत्संग मंडपातील उष्णतेमुळे लोक बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुघर्टनेत आतापर्यंत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका पोहोचण्यास बराच विलंब झाला. स्थानिक लोकांनी जखमींना जवळच्या हॉस्पिटल आणि एटा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
हाथरसचे डीएम आशिष कुमार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. जखमींना रुग्णालयात नेलं जात आहे आणि जखमींवर उपचार सुरु आहेत. या कार्यक्रमासाठी उपविभागीय दंडाधिकार्यांनी (डऊच्) परवानगी दिली होती आणि हा एक खाजगी कार्यक्रम होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. दुर्घटनास्थळी शक्य ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचे प्राथमिक लक्ष आहे. जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत कऱण्यात येत आहे.

0 Comments