परळी : तालुक्यातील मरळवाडी गावचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर शनिवारी येथील बँक कॉलनीत रात्री ८.३० वाजता गोळीबार करण्यात आला. यात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यु झाल्या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गटा)चे उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध खुनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी दाखल करण्यात आला होता. या आरोपीना फरार करण्यासाठी मदत केलेल्या चौघांना केज आणि धारूर पोलिसांनी अटक केली असून हे आरोपी परळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.
परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार आंधळे यांच्या खून प्रकरणात ग्यानबा उर्फ गोटया मारोती गित्तेच्या तक्रारीवरून बबन गित्तेसह पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक विषयाच्या वादातून ही घटना घडली होती.बीड जिल्ह्यात घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी मोहीम गतिमान केली आहे. मुख्य आरोपी व इतर आरोपीना फरार होण्यासाठी त्यांना वाहन उपलब्ध करून देणे तसेच इतर मदत केल्याप्रकरणी आसाराम दत्ता गव्हाणे (वय-२३),मयूर सुरेश कदम (वय-२९),रजतकुमार राजेसाहेब जेधे (वय-२७),अनिल बालाजी सोनटक्के (वय-२३)या चौघाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी बबन गित्ते व त्याचे साथीदार अद्याप फरार असून पोलीस निरीक्षक संजय लोहकरे व पोलिसांचे पथके आरोपीचा शोध घेत आहेत.

0 Comments