Header Ads Widget

Responsive Advertisement

जयंत पाटलांनी विधानसभेची तारीखच सांगून टाकली



मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे यश मिळाल्यामुळे आता विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. यामध्ये कोणत्या पक्षाच्या वाटट्याला किती जागा येतात हे जरी कळणार असले तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील यांनी विधानसभेची निवडणूक २० ऑक्टोबरला होईल असे सांगूनच टाकले. त्यामुळे खरोखरच दिवाळीला कोणाच्या नावाने फटाके फुटतात आणि कोणाचे फुसके बार निघतात हे कळणार आहे.

महायुतीमध्ये सारे काही आलबेल नसून शिंदे शिवसेना, भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचे अपयश शिवसेना आणि भाजपा अजित पवारांवर लादत आहेत. तर अजित पवार गटही दोघांना जोरदार प्रत्यूत्तर देत आहे. यामुळे अजित पवार गट महायुतीत राहणार की बाहेर पडणार याचीही चर्चा रंगू लागली आहे.

अजित पवार गटातील आमदार नाराज असून ते लवकरच शरद पवारांकडे परतण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यात छगन भुजबळांचे नावही आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनीच कोणाला परत घेणार कोणाला नाही याची अट जाहीर केली आहे. तसेच मविआच्या मित्रपक्षांनाही विचारणार असल्याचेही म्हटले आहे. यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांची अवस्था ना घर का ना घाट का अशी होणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

येणार्‍या विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. शिवसेनेलाही उद्धव ठाकरे यांच्यामुळे चांगला प्रतिसाद मिळेल. विधानसभा निवडणुकीत तिनही पक्षांना चांगला प्रतिसाद मिळेल, काही दिवसातच जागावाटपावर चर्चा होणार आहे, असंही आमदार जयंत पाटील म्हणाले. आमच्या पक्षाला मधल्या काळात मोठ्या प्रमाणात त्रास झाला. त्यामुळे जे पक्षासाठी योग्य आहे तोच निर्णय घेऊ, असंही पाटील म्हणाले. यावेळी पाटील यांनी विधानसभा निवडणूक २० ऑक्टोबरला होईल असे सांगितले. 

Post a Comment

0 Comments